1930 च्या काळात, पॉल ब्रन्टन यांनी इजिप्तमधील गूढांचा आणि यातुविद्येचा जो अनुभव घेतला, तो "रहस्यमय इजिप्तचा शोध (अ सर्च इन सिक्रेट इजिप्त)" या पुस्तकात ग्रथित आहे. इजिप्तमधील गूढात्मक मंदिरे आणि देवता यांचे आध्यात्मिक महत्त्व यांचा धांडोळा त्यांनी घेतला आहे. त्याचबरोबर ग्रेट पिरॅमिड या वास्तूच्या आत त्यांनी एकट्याने व्यतीत केलेली ज्ञानपूर्ण अनुभवाची आणि काहीशा भीतीची जी रात्र होती, तिचेही वर्णन या ग्रंथात आढळते. शरीर व मन यांना शक्य असलेल्या सर्वोच्च अशा बिंदूवर पोहोचायचा ब्रन्टन यांनी प्रयास केला. प्राचीन इजिप्तमधील मंदिरांमध्ये सुयोग्य अशा साधकांच्या बाबतीत जो दीक्षाविधी केला जाई, तो अतिशय नाट्यपूर्ण असे. त्या दीक्षाविधीच्या वेळी योगाचे विविध प्रकार आणि जादू वा यातुविद्या यांची सरमिसळ होत असे, त्यांना खर्या आध्यात्मिकतेपासून चिकित्सकपणे बाजूला काढून अभ्यास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.या प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या माणसांशी त्यांची गाठ पडली. त्यात तांत्रिक होते, फकीर होते, दरवेश होते, आणि विद्वान व्यक्ती होत्या. त्यांनी सर्पविद्येत प्रावीण्य मिळविले. मुस्लीम नेत्यांशी त्यांनी जो मनमोकळा संवाद साधला, तो आजही कालोचित आहे. हज यात्रेचे त्यांनी जे वर्णन केले, त्यातून महंमदांच्या खर्या अनुयायांच्या श्रद्धेचे सौंदर्य आणि प्रेरणा सूचित होते. अंतिम टप्प्यात, ब्रन्टन यांनी स्वतःच्या आध्यात्मिक मार्गाकडे लक्ष वळविलेले दिसते. त्यांना जे अनुभव आले, त्यातून ते सांगतात की आपण आपल्या शरीरापलीकडे काही असतो आणि आत्म्याचे मुक्तपण इथे आणि आत्ता अनुभवता येऊ शकते.